सोलापूर - पोलीस प्रशासनाच्या अथक परिश्रमातून आज(मंगळवारी) सोलापूरात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले आहेत. भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सोलापूकरांना शिस्त लावण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश मिळाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
मागील सहा दिवसापासून सोलापूर शहरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली होती. आज संचारबंदीमध्ये सूट देण्यात आली आहे. सकाळी 10 ते 1 पर्यंत भाजीपाला खरेदीसाठी सूट देण्यात आली आहे. भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन केले होते. पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे काही प्रमाणात सोलापूरकरांमध्ये आज शिस्त पाहायला मिळाली.
सोलापूर शहरात एकूण 18 ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी नियोजन करण्यात आले होते. भाजीपाला खरेदी करत असताना विक्रेत्यांनादेखील सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी नियोजन केले होते. गेल्या सहा दिवसापासून बंद असल्यामुळे सोलापूरकर मोठ्या प्रमाणावर भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडले होते. मात्र, आज सर्वजण शिस्तीचे पालन करत असल्याचे चित्र पहायला मिळाले. ज्या त्या भागातील लोकांनी त्या त्या भागातच किराणा माल व भाजीपाला खरेदी करावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. वाहन घेऊन बाहेर पडणाऱ्या व्यक्तींची वाहने जप्त करण्यात येतील, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.