सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामीण भागातून एका ध्येयवादी युवतीने अमेरिकेतील न्यूयॉर्क फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करत आपल्या स्वप्नांना झळाळी देण्याचे काम केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील फॅशन कन्या पायल मंडवालकर यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये फॅशनच्या जगतामध्ये आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्यातूनच न्यूयॉर्क फॅशन शो सारख्या नावाजलेल्या शोमध्ये रॅम्पवॉक करण्याची संधी पाहायला मिळाली. यातूनच ग्रामीण भागातील ध्येयवादी तरुणींसाठी पायल या नेहमीच प्रेरणादायी ठरत आहे.
8 मार्च हा जागतिक महिला दिन सर्व जगभर साजरा केला जात आहे. यातच आपल्या जिद्दीच्या जोरावर विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचा या दिवशी सन्मान करण्यात येतो. त्यातच ग्रामीण भागातील युवतींकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्याची दखल घेतली जाते. पायल यांचाही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवास हा नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहे. बार्शी ते अमेरिकेतील फॅशन क्वीन म्हणून आज पायल या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या आहेत.
पायल यांना लहानपणापासून फॅशन जगताबाबत विलक्षण असे आकर्षण निर्माण झाले होते. पायल मंडेवालकर या मूळच्या बार्शी तालुक्यातील शेंद्री गावच्या रहिवासी. ज्योती प्रकाशराव जहागिरदार असे त्यांच्या माहेरचे नाव आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण बार्शीतील सुलाखे हायस्कूल येथेच झाले. तर, बारावीपर्यंतचे शिक्षण श्री. शिवाजी महाविद्यालयात पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांना मुंबईला जावे लागले. मुंबईच्या टेशन नगरीमध्ये पायल यांना आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली.
लहानपणापासूनच फॅशनच्या जगतामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करावे. यासाठी शाळेतील होणाऱ्य स्पर्धेमध्ये पायल भाग घेत असत. फॅशनेबल बनत, हटके ड्रेस, शाळेत जाण्यापूर्वीची हेअरस्टाईल आणि सुंदर दिसणारा लूक करत, पुढे मुंबईतील एसएनडीटी कॉलेज येथे इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. मात्र, अभियांत्रिकी शिक्षणापेक्षा फॅशन जगात आपले स्थान निर्माण करण्याची संधी पाहायला मिळाली. यातूनच त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यास सुरवात केली. त्यातच एका महाविद्यालयीन कार्यक्रमात तिला बिपाशा-जॉन हे फॅशन जजेस म्हणून आले होते. यातूनच त्यांनी बारीक-सारीक गोष्टींवर भर देण्यास सुरुवात केली होती.
2018 नंतर मला या क्षेत्रात काही बदल दिसून आले, केवळ आपली सुंदरता, उंची किंवा शरीरयष्टीच महत्त्वाची नाही. तर, आत्मविश्वास, सकारात्मक एटीट्यूड, कॅमेरा फेसिंग, फॅशनचे पॅशन, कॅटवॉक या गोष्टीही महत्वाचे असल्याने प्रकर्षणाने काम सुरू केले. पायल यांनी साडी मॉडेलपासून, लोकल डिझायनरच्या शोंमधून करिअरची सुरुवात केली. 3 ते 4 फॅशन कोरिओग्राफरकडून ट्रेनिंग घेतले. लुबना आदम, मनिष मल्होत्रा यांच्या भेटीनंतर त्यांच्यातील मॉडेल बनण्याचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला. मिसेस एशिया वर्ल्ड 2021 'एलिट'चा खिताब जिंकण्यापर्यंत मजल मारली.
'एक्स्ट्रीम थ्रील टू बी पार्ट ऑफ न्यूयॉर्क फॅशन वीक' हे त्यांचेच वाक्य त्यांच्या आजपर्यंतच्या 'पॅशेनेबल' प्रवासाची टॅगलाईन म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी सारख्या ग्रामीण भागातून अशाप्रकारे अमेरिकेच्या रॅम्पवर पायल मंडेवालकर यांनी आपले नाव कोरले आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी हा प्रेरणादायी प्रवास ठरला आहे.
हेही वाचा - Young Farmer Suicide : 'शेतकऱ्यांच्या पोटी परत जन्माला येणार नाही', म्हणत तरुणाची आत्महत्या