पंढरपूर (सोलापूर) - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विठ्ठल मंदिर ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, या काळात विठोबाचा काकडा, धुपारती, शेजारती अशा नित्योपचार पूजा सुरू राहणार आहेत, अशी माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारणीसाठीच्या भूमिपूजनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन मुहूर्तावर विठ्ठल मंदिरासह राज्यातील विविध देवस्थान पण चालू करण्याची मागणी हिंदू संघटना, तसेच वारकरी संप्रदायाकडून होत आहे. त्यात आता विठ्ठल मंदिर 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद केले होते.
पंढरपूर आणि परिसरात कोरोना संसर्ग वाढत आहे. त्या दृष्टीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरीत सध्या ५३३ कोरोना बाधित रुग्ण आहेत.