पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी पंढरपूर शहर पोलिसांनी शिताफीने कर्नाटक येथील म्हैसूर येथून अटक केली आहे. गेल्या तीन वर्षापासून पोलिसांना सुनील वाघ व सचिन देवमारे हे दोन्ही आरोपी वेशभूषा बदलून गुंगारा देत होते. संदीप पवार यांच्या हत्येतील 26 आरोपी पंढरपूर शहर पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.
तीन वर्षांपासून पोलिसांना देत होते गुंगारा
पंढरपुरातील नगरसेवक संदीप पवार यांचा २०१८ रोजी स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेलमध्ये बंदुकीने गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी २४ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र सुनील वाघ हा तेव्हापासून फरार होता. त्याचा शोध घेण्याचे काम पोलीस मागील तीन वर्षापासून प्रयत्न करत होते. सुनील वाघ, सचिन देवमारे आणि अन्य एक असे तीन संशयित आरोपी फरार होते. त्यातीन पैकी सुनील वाघ आणि सचिन देवमारे हे कोल्हापूर, बेळगाव येथे काही दिवस राहिले आणि गेल्या काही दिवसांपासून ते दोघे कर्नाटकमधील म्हैसूर येथे नाव बदलून राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
गुंड सुनील वाघ याला नऊ दिवसाची पोलीस कोठडी
माजी नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनातील मुख्य आरोपी असणाऱ्या सुनील वाघ हा गेल्या तीन वर्षापासून पंढरपूर पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुणे व सोलापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. मात्र पोलिसांनी माहिती मिळाली की तो कर्नाटकातील म्हैसूर येथे नाव बदलून राहत आहे. पोलिसांनी अत्याधुनिक साधनाच्या साह्याने सुनील वाघ व सचिन देव मारे याला बेड्या ठोकले. त्याला पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयमध्ये हजर केले असता न्यायालयाकडून त्याला नऊ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सातपुते यांनी दिली आहे.
हेही वाचा - म्हैसूर सामूहिक बलात्कार : तामिळनाडूतील ५ आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या