पंढरपूर - पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसमोर अपक्ष बंडखोर उमेदवारांचे मोठे आव्हान असणार आहे. भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांना त्यांचेच चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी आव्हान दिले आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना मित्र पक्षातील उमेदवारांनी अडचणीत आणले आहे. दरम्यान शेवटच्या दिवशी पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी 11 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात 19 उमेदवार राहिले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले, धनगर समाजाचे नेते माऊली हळणवर, मंगळवेढा येथील संजय पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. याचा फायदा भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांना होणार आहे. मात्र समाधान अवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने, भाजपाला मंगळवेढ्यामध्ये फटका बसण्याची शक्यत आहे.
भगीरथ भालके यांना मित्र पक्षातील बंडखोरांचे आव्हान
महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीच आडचणीत आणले आहे. यामध्ये शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे व स्वाभिमानीचे सचिन शिंदे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे भगीरथ भालके यांना ग्रामीण भागात फटका बसण्याची शक्यता आहे.
19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज एकूण 11 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण 19 उमेदवार राहिले आहेत. या पोटनिवडणुकीसाठी एकूण 30 उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले होते.
हेही वाचा - आम्ही सरकारसोबत, मात्र लॉकडाऊनचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा - उपाध्ये