सोलापूर - मोहोळ येथे राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमधील वैयक्तिक आणि राजकीय वाद उफाळून आला आहे. वर्चस्वाच्या इर्षेतून दोन शिवसैनिकांच्या अंगावर टेम्पो घालून त्यांचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. गेल्या तीन आठवड्यापासून फरारी असलेल्या राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना मोहोळ पोलिसांनी अखेर अटक केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यात एका मंदिरामध्ये या सर्व आरोपींनी आसरा घेतला होता. मोहोळ पोलिसांनी वेषांतर करून पाचही संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
अटक केलेल्या आरोपींची नावे -
संतोष जनार्दन सुरवसे, पिंटू जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा अनिल फडतरे, रमेश ऊर्फ गोटू सुरवसे आणि आकाश बरकडे (सर्व रा. मोहोळ)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून पाचही संशयित आरोपी फरार झाले होते. टेम्पो चालक भैय्या अस्वले यास यापूर्वीच मोहोळ पोलिसांकडून अटक करण्यात यावी आहे. त्याने हा अपघात नसून खून असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. याच्या कबुली जबाबवरून मोहोळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
गेल्या १५ जुलै रोजी सतीश नारायण क्षीरसागर (वय ३०) व त्याचे सहकारी विजय नागनाथ सरवदे (वय २४, दोघे रा. सिद्धार्थनगर, मोहोळ) या दोघा तरुण शिवसैनिकांच्या अंगावर टेम्पो घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. अपघाताचा बनाव करून हत्या करण्याचा प्लॅन होता. या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नावे संशयित म्हणून समोर आली होती. मोहोळ पोलिसांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरवली, परंतु गेल्या 15 दिवसापासून पाचही संशयीत आरोपी पोलिसांनी हुलकावणी देत होते.
दोघां शिवसैनिकांच्या हत्येमागे प्राथमिक कारण समोर आले -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार महिन्यांपूर्वी मोहोळ शहरातील प्रभाग क्र . ८ व ९ मधील मतदार नोंदणी खोटी आणि बनावट असल्याचा आक्षेप शिवसैनिक सतीश क्षीरसागर व विजय सरवदे यांनी घेतला होता. तसेच बनावट मतदार यादी रद्द व्हावी यासाठी मोठे आंदोलन मृत सतीश क्षीरसागर व विजय सरवदे यांनी मोहोळ तहसील कार्यालयासमोर केले होते. त्यावर चौकशी होऊन बनावट मतदार नोंदणी यादी रद्द झाली होती. तसेच रमाई घरकुल योजनेत मंजूर झालेली १८ प्रकरणे गायब झाल्याने त्यास वाचा फोडण्यासाठी क्षीरसागर व सरवदे यांनी आंदोलन केले होते. यात हितसंबंध आडवे आल्यामुळे राष्ट्रवादीचे संतोष सुरवसे आदी त्यांच्यावर चिडून होते. त्यातूनच कट रचून क्षीरसागर व सरवदे या दोघांना जेवायला म्हणून बोलावले आणि त्या दोघांचा खून केल्याचा आरोप आहे. पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील हे अधिक तपास करीत आहेत. संशयित आरोपींना अटक करून त्यांची 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.