सोलापूर - नाताळाच्या सुट्ट्या असल्यामुळे पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मीणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व भक्तांना लवकर दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीने दर्शनासाठीची ऑनलाईन बुकींग बंद करण्यात आली आहे. येत्या २ जानेवारी २०२० पर्यंत ही बुकींग बंद असणार आहे.
नाताळनिमित्त पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढली आहे. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, नगरप्रदक्षिणा मार्ग भाविकांनी गजबजून गेला आहे. नाताळ सणाच्या काळात अनेकजण सुट्टी काढून पर्यटन तसेच धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरात राज्य-परराज्यातून दर्शनासाठी भाविक दाखल झाले आहेत.
शहरातील धर्मशाळा, भक्तनिवास भाविकांनी गजबजले आहे. याठिकाणी माफक दरात चांगली सुविधा मिळत असल्याने अनेकजण मुक्कामी येतात. चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा आणि त्यानंतर विठ्ठलाचे पदस्पर्श किंवा मुखदर्शन असा भाविकांचा दिनक्रम असतो. गेल्या ३ दिवसात पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांचे जलद दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून २ जानेवारी २०२० पर्यंत दर्शनासाठीची ऑनलाइन बुकिंग सुविधा बंद केली आहे. तसेच दर्शन रांग जलद गतीने पुढे जावी यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांचीही मदत घेण्यात आली आहे. मंदिर समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांची रजा आणि साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली असल्याचे मंदिर प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.