सोलापूर - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास 500 ट्रक कांद्याची आवक झाली आहे. आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे कांद्याचे दरही कोसळले आहेत. सगळीकडे बंद असला तरी कांद्याला मात्र 800 रूपये ते एक हजार रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्या काही दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव होणार असल्याची माहिती सगळीकडे गेल्यामुळे आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 500 ट्रक कांद्यांची आवक झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांद्याच्या व्यापारासाठी राज्यातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते. कांदा हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये येतो.
कांद्याची विक्री व्हावी, यासाठी बाजार समितीमध्ये कांद्याचे व्यवहार सुरू करा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर सोलापुरात कांद्यांचे सौदे आजपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती झाल्यामुळे बाजार समितीमध्ये 500च्या जवळपास गाड्यांची आवक झाली.
कांदा हा नाशवंत असल्यामुळे तो जास्त दिवस ठेवता येत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी हा कांदा विक्रीसाठी आणलेला आहे. कांदा आवक मोठ्या प्रमाणावर झाली असल्यामुळे सोलापुरात कांद्याला प्रतिक्विंटल 800 ते 1 हजार रूपये दर मिळाला आहे.