सोलापूर - शहरात कोरोनाचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १३वर पोहोचली आहे. सर्व कोरोनाग्रस्तांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नव्हता. मात्र, अचानक एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले. त्यानंतर एका नर्सला कोरोनाची लागण झाली होती. दोन दिवसांपूर्वी आणखी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच काहीजणांना क्वारंनटाईन करण्यात आले होते. त्यापैकी आज एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित रुग्ण रविवार पेठ भागातील रहिवासी असल्यामुळे तो परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. जंतूनाशकाची फवारणीदेखील करण्यात आली आहे. तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण १६० जणांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवले आहेत. मात्र, त्यांचे अहवाल अद्यापही प्राप्त झाले नसल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.