सोलापूर - दुचाकी आणि एसटीची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी कुंभेज फाटा ते पोफळज रस्त्यावर बाबर वस्ती येथे घडला. जखमीस सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - नंदुरबारात साडेतीन लाखांचा अवैध दारूसाठा जप्त
बळीराम रामहरी वैद्य (वय-४५) हे अपघातात मृत झाले आहेत. तर साधू नाना खोलासे हे जखमी झाले आहेत. दोघेही केडगाव (ता. करमाळा) येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी बस चालक गणेश तुळशीराम जाधव राहणार लोहारा (ता. परांडा जि. उस्मानाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अपघातातील मृत बळीराम रामहरी वैद्य व साधू नाना खोलासे हे कुंभेज फाटा ते केडगावच्या दिशेने मोटारसायकलवरुन (क्रमांक एमएच ४५ ए.सी. ५०९३) जात असताना समोरून भरधाव वेगात येणारी एसटी (क्रमांक एमएच १४ बी. टी. ०९४५) करमाळ्याच्या दिशेने येत होती. त्यावेळी बससोबत मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. यावेळी मोटारसायकलवरील बळीराम वैद्य हे जागीच ठार झाले. तर साधू नाना खोलासे हे गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, उपस्थित लोकांनी दोघांनाही उमरडचे विनोद बदे यांच्या खाजगी गाडीमध्ये करमाळ्याच्या दिशेने रवाना केले. रस्त्यात रुग्णवाहिका मिळाल्याने त्यात रुग्णांना करमाळा येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी वैद्य यांस डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर खोलासे गंभीर जखमी असल्याने सोलापूर येथे हलवण्यात आले आहे. राजेद्र कुंडलिक वैद्य यांनी तक्रार दिली आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय शेळकांदे हे करत आहेत.
हेही वाचा - हस्तिदंत तस्करी करणाऱ्याला स्वारगेटहून अटक