सोलापूर - मटका बुकीवर गुन्हे शाखेने धाड टाकली. तेथील परवेज नुरुद्दीन इनामदार (वय 42 वर्षे, रा. साईनाथ नगर, सोलापूर) याने पोलिसांना घाबरून पळण्याच्या घाई गडबडीत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
सोलापूर येथील अशोक चौक परिसरातील कोंचीकोरवे गल्लीत मटका बुकीचा मोठा बाजार चालतो, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (24 ऑगस्ट) दुपारी छापा टाकला. यात संशयीतांना रंगेहात पकडून मुद्देमाल जप्त करायचा पोलिसांचा उद्देश होता. मात्र, छापा टाकल्यानंतर मटका बुकीवर काम करणाऱ्या कामगारांची धावपळ उडाली. तेथे उपस्थित असलेले सर्वजण पळू लागले. त्यात परवेज इनामदार याने मटका बुकी सुरू असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला व त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक संजय जगताप, सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाफर मोगल व गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी याबाबत अधिक माहिती न देता घटनास्थळी येऊन पाहणी केली. हे मटका बुकी एका नगरसेवकाचे असल्याची माहिती समोर येत आहे. तर मृत परवेज यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई, असा परिवार आहे.
हेही वाचा - मद्यधुंद ट्रक चालकाने चेकपोस्ट उडविले; हैदराबाद नाक्यावर मध्यरात्रीची घटना