सोलापूर - महसुली व्यवस्थेच्या विरोधात सोलापुरातील एका वृद्धाने चक्क नग्नावस्थेत तहसील कार्यालयात आंदोलन केले आहे. उत्तर सोलापूर तालुका तहसील कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे तहसील कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता. या घटनेमुळे कार्यालयातील महिला कर्मचारी अक्षरशः पळून गेल्या आहेत. गेल्या 3 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेची रक्कम मिळत नसल्याने या वृद्धाने आंदोलन केले. कुमार संदीप मोरे (रामवाडी परिसर) असे आंदोलन करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे.
शहरातील रामवाडीत राहणाऱ्या या कुमार मोरेंना गेल्या 3 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेतून मिळणारी रक्कम मिळाली नव्हती. याबाबत मोरेंनी तहसील कार्यालयात अनेकवेळा तक्रार केली. मात्र, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी आज हे आंदोलन केले आहे.
मोरे हे आज ते पुन्हा सदर रकमेच्या संदर्भात विचारण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांना अधिकाऱ्यांनी आरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे संतप्त मोरेंनी, अशा या आंदोलनाचे पाऊल उचलले. या प्रकारानंतर पोलिसांनी या वृद्ध आंदोलकाला ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले.