सोलापूर - मकरसंक्राती सणाच्या कालावधी दरम्यान पतंग उडवली जाते. मात्र, सध्या लॉकडाऊन कालावधी दरम्यानही, अनेक जण टाईमपास म्हणून पतंग उडवत आहेत. मात्र, यावेळी बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होताना दिसत आहे. यामुळे येथे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत 25 ते 30 वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांचा या मांजामुळे जीव गेला आहे, अशी माहिती पक्षीप्रेमी मुकुंद शेटे यांनी दिली. यामुळे असा हा टाईमपास जीवघेणा अनेकांसाठी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोलापूर शहरात बंदी असलेला नायलॉन मांजाची खुलेआम विक्री केली जात आहे. या पतंगबाजीमुळे किरकोळ माऱ्यामाऱ्याही वाढल्या आहेत. याआधी नायलॉन मांजामुळे काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर काही जण जखमीही झाले आहेत. महाराष्ट्र आणि देशात अनेक अशी उदाहरणे आहेत.
गेल्या वर्षी पुणे येथील महिला (सुवर्णा जाधव) या आपल्या दुचाकी वाहनावर जात होत्या. यावेळी नायलॉन मांजा आडवा आल्यामुळे त्या महिलेचा गळा कापला गेला. यानंतर उपचारा दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला होता. उत्तर भारतात आणि गुजरातमध्येही अनेक वाहनचालक या नायलॉन मांजामुळे अडकून जखमी झाले आहेत. तर पतंग उडवत असताना इमारतीवरुन पडूनही अनेक जण जखमी झाल्याची उदाहरणे आहेत.
मृत पक्ष्यांमध्ये कावळा, घार, पोपट, कबुतर, चिमणी आदींचा समावेश आहे. तर या मजबूत अशा नायलॉन दोरीमुळे करंट सप्लाय करणाऱ्या वायरीदेखील तुटल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अनेक पक्षीप्रेमींनी या नायलॉन मांजाची विक्री बंद करावी, अशी विनंती प्रशासनाला केली आहे.
- पतंग उडवण्यावरुन वादही -
दरम्यान, पतंग उडवण्याच्या कारणावरुन काही ठिकाणी वादही निर्माण झाले आहेत. जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकावर लोखंडी सळईने हल्ला झाल्याची घटना घडली. तर विजापुर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पतंग उडवण्यावरून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शहराच्या विविध भागात इमारतीवरुन बच्चे कंपनी पतंग उडवित आहेत. एकमेकांची पतंगे कापण्याच्या शर्यती लागल्या आहेत. तर खाली रस्त्यावर दुसरी बच्चे कंपनी कटलेल्या पतंगच्या मागे बेफिकीर धावत पळत सुटत आहेत. यामुळे अपघातात यांचा जीवदेखील जाऊ शकतो.
- पंतग आणि मांजा विक्री -
पतंगाच्या दुकानात 10 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत प्लास्टिकचे पतंगची विक्री केली जात आहे. तर बंदी असलेला नायलॉन मांजा किंवा चिनी मांजा 300 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यत विक्री केली जात आहे. ही विक्री किडवाइ चौक, कोर्ट परिसर, नई जिंदगी, बाशा पेठ, साखर पेठ आदी भागात नायलॉन मांजाची विक्री होत आहे.
- नायलॉन मांजा एक 'शस्त्र'च -
पूर्वी कागदी पतंगे आणि सुती दोरीपासून बनवलेले मांजे उपलब्ध होत होते. हा सुती दोरीचा मांजा कालांतराने कुजून नष्ट होत होता. मात्र, हा नायलॉन मांजा लवकर नष्ट होत नाही. तर उलट अतिशय प्राणघातक असतो. यामुळे नायलॉन मांजाला एक चालतं फिरत धारदार शस्त्रच आहे, अशी परिस्थिती तयार झाली आहे.