सोलापूर - शहरात तीन डॉक्टरांसह एक नर्स आणि एका नगरसेवकाला कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत चार डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील एक डॉक्टर हे ग्रामीण भागातील प्राथामिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 65 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोमवारी मिळालेल्या अहवालात 4 जण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. हे रुग्ण शहरातील न्यू तिऱ्हे (वनविभाग), सिव्हील हॉस्पिटलच्या जवळचा भाग, शास्त्री नगर या भागातील आहेत. सोमवारी दिवसभरामध्ये एकूण 23 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 19 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले. तर 4 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
हेही वाचा - कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारची नवी रणनीती, त्रीस्तरीय केंद्रांतून होणार उपचार
आत्तापर्यंत 1280 रुग्णांपैकी 1075 जणांचे अहवाल आले आहेत. यात 1010 निगेटिव्ह तर 65 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. आणखी 205 अहवाल हे प्रलंबित आहेत. 65 पैकी 5 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे. सोमवारी लागण झालेल्यामध्ये सोलापूर महापालिकेच्या नगरसेवकांचा समावेश आहे. हा नगरसेवक त्यांच्या प्रभागामध्ये गोर गरिबांना धान्य वाटप आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत होता. या नगरसेवकालाच कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल सोमवारी आला.