सोलापूर - श्री. विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाइन पासची सक्ती प्रशासनाने केली होती. आता या पासवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने पासची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता विठ्ठल भक्तांना पास न घेता विठ्ठलाचे दर्शन करता येणार आहे. आठ हजार भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे.
हेही वाचा - अवैधरित्या वाहतूक होणारी दोन ब्रास वाळू जप्त, आठ जणांवर गुन्हा दाखल
कोरोनामुळे 17 मार्चपासून राज्यातील इतर मंदिरांप्रमाणे पांडुरंगाचे मंदिरही नऊ महिने बंद ठेवण्यात आले होते. दिवाळी पाडव्यापासून कोरोनाचे सर्व नियम पाळून ऑनलाइन पासद्वारे श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मुखदर्शनाची सोय मंदिर समितीकडून करण्यात आली होती. आधी तीन हजार भाविकांना मुखदर्शनाची परवानगी देण्यात आली. त्यानंतर ती पाच हजार करण्यात आली. मात्र, उद्यापासून दररोज आठ हजार भाविकांना विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
65 वर्षांवरील वृद्ध व्यक्ती, 10 वर्षांखालील लहान मुलांना बंदी
आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीमध्ये ऑनलाइन बुकिंग करूनही मंदिर भाविकांविना रिकामे राहत असल्याचे दिसून आले. त्यामुळे, ऑनलाइन पासची गरज नसल्याचा निर्णय मंदिर समितीकडून घेण्यात आला. आता भाविकांना ओळखपत्र दाखवून मुखदर्शन घेता येणार आहे. दरम्यान, 65 वर्षावरील वृद्ध व्यक्ती आणि 10 वर्षाखालील लहान मुलांना मंदिरातील प्रवेश बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
विठ्ठल मंदिर समितीकडून निर्णय
मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज मंदिर समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये विनापास दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती औसेकर महाराज यांनी दिली. बैठकीला समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जवळगावकर, संभाजी शिंदे, साधना भोसले, शकुंतला नडगिरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - आदिनाथ कारखाना चालू करण्याआधी कामगारांचे थकीत वेतन द्या : दशरथ कांबळे