पंढरपूर (सोलापूर) - 9 जुलैला आषाढीची सांगतासाठी केल्या जाणाऱ्या प्रक्षाळ पूजेत गाभाऱ्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अंगावर पाणी घातल्यावर नवा वाद झाला होता. या घटनेनंतर राज्यभरातून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, याची सखोल चौकशी करण्याच निर्णय घेतला आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मात्र मंदिराच्या कामकाजात या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भाग घेत येणार आहे.
राज्यभरातील लाखो वारकऱ्यांनी आपल्या लाडक्या विठुरायाचे रूप आठवत घरूनच वारीचा आनंद घेतला होता. आषाढीच्या दरम्यान पूर्वीपासून हजारो भाविक मंदिरात आल्याने मंदिर घाण होते आणि ते साफ करण्यासाठीची ही प्रक्षाळ पूजा केली जाते. पूजेचे औचित्य मंदिरासोबत देवाचा गाभारा आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची सफाई अशीच होती. प्रक्षाळ पूजेच्या वेळी मंदिर धुतल्यानंतर आणि विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक झाल्यानंतर उरलेल्या पाण्याने मंदिरात स्नान करण्याची परंपरा आहे. मंदिरात स्नान करायची प्रथा नक्कीच आहे. मात्र, ती गाभाऱ्यात नाही तर मंदिराच्या दुसऱ्या भागात असते, पण प्रथा परंपरांची माहिती नसलेल्या कर्मचाऱ्यांनी देवाला स्नान घातल्यानंतर एक तांब्या तसाच कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकला आणि नव्या वादाला तोंड फुटले. या प्रकरणाची राज्यात मोठी टीका झाली होती. त्याची दखल मंदिर समितीकडून घेण्यात आली आहे.
21 जुलैला विठ्ठल मंदिर समितीने व्हिडिओ कॉन्फ्रसिंगव्दारे या सदस्याची बैठक घेतली. सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. यावेळी शकुंतला नडगिरी, माधवी निगडे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरु, किसानगिरी बुवा, संभाजीराजे शिंदे, आ. सुरजीतसिंह ठाकूर, ज्ञानेश्वर महाराज जवळगावकर, प्रकाश महाराज जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे, शिवाजीराव मोरे, नगराध्यक्षा साधना भोसले यांची उपस्थित होती. प्रक्षळ पूजाच्या प्रकरणाची बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धपत्रकाव्दारे देण्यात आली.