सोलापूर - अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर अजित पवार यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
अजित पवार यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय चुकीचा असल्याच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्तांनी बोलून दाखवल्या आहेत. मात्र, अजित पवार यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तीक असून, पक्ष या निर्णयाचे समर्थन करत नसल्याची भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अजित पवारांचा निर्णयाविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चार हुतात्मा पुतळ्यासमोर अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन केले.