पंढरपूर (सोलापूर)- पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी कारखान्याकडून गेल्या वर्षीची शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम व कामगारांचे वेतन थकीत बिला प्रकरणी कारखान्याचे चेअरमन भालके व संचालक मंडळातील वाद चव्हाट्यावर आला आहे. विठ्ठल संचालकांकडून चेअरमन भगीरथ भालके यांच्या राजीनाम्याची संचालक युवराज पाटील यांनी मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकत्व घेतलेल्या कारखान्याचे अवस्था बिकट झाली आहे. या कारखान्याच्या वादातून पंढरपुरातील राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
राजकारणाचा केंद्रबिंदू विठ्ठल सहकारी कारखाना
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी कारखाना हा पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक कारणामुळे विठ्ठल साखर कारखाना डबघाईला आला आहे. पंढरपूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून विठ्ठल कारखान्याकडे पाहिले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीदरम्यान कारखानातील थकीत बिलाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासनही दिले होते. उपमुख्यमंत्री अजित दादांनी पालकत्व घेतलेल्या कारखान्याचे अशी अवस्था आहे. त्यातून आता राष्ट्रवादी मध्ये दोन गट कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीतील एका गटाने चेअरमन भालके यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे तर दुसऱ्या गटाने भगीरथ भालके यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहे.
चेअरमन भालके यांच्या राजीनाम्याची मागणी...
विठ्ठल कारकान्याच्या सत्ताधाऱ्यांकडून विठ्ठलच्या थकीत बिलासाठी राज्य सरकारकडून अनुदान रूपी रक्कम मंजूर करण्याचे आश्वासन भगीरथ भालके यांनी दिले, असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले. तर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके हे कारखाना चालवण्यात अक्षम्य असल्याचा आरोप संचालक युवराज पाटील यांनी केला आहे. गेल्या वर्षीतील गाळप हंगामातील शेतकऱ्यांचे एफआरपी कामगारांचे वेतन ठेकेदारांची थकीत बिले कारखान्यांकडून अद्यापही देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर वारंवार आंदोलनेही केली आहेत.
कारखान्याच्या गेटला कुलूप लावून या थकीत बिले द्यावी म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन चेअरमन भगीरथ भालके यांनी आठवड्याभरात थकित बिलाचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या व कामगारांचे पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे आता संचालक मंडळातील सभासदांकडून चेअरमन भगीरथ भालके यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.