सोलापूर - एकीकडे सचिन अहिर यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकलेला. तर अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. असे असतानाच ग्रामीण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांच्या बळावर आजही राष्ट्रवादीचा करिश्मा कायम आहे, असा दावा राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी केला आहे.
सोलापुरातील राष्ट्रवादी भवनात आज पक्षाचे निरीक्षक अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. त्यासाठी मोहोळ मतदारसंघातील काही इच्छुकांसोबत आमदार राजन पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी हा दावा केलाय.
राज्यात सध्या मतदारसंघाच्या सोयीनुसार भाजप-सेनेच्या दारात काँगेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवबंधन बांधले. त्यापाठोपाठ वैभव पिचड, अशी भली मोठी यादी आहे. अशीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातही आहे. मात्र याला अपवाद आहे, तो मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघ. येथील परिस्थिती नेमकी कशी आहे, हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रवीण सपकाळ यांनी.
2014 च्या विधानसभा निवडणूकीत याच राजन पाटील आणि काका साठे यांनी मुंबईच्या रमेश कदमांना अवघ्या 15 दिवसांत आमदार म्हणून विधानसभेत पाठवले होते. त्यामुळे राज्यात सगळीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात उलथा पालथ सुरू असताना मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे गुडविल कायम आहे. ते केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर.