सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत विडी कारखाने सुरू करा. अन्यथा, कारवाई करण्यात येईल, असा इशारा सोलापूर महापालिका आयुुक्त पी. शिवशंकर यांनी दिला आहे. कामगारांच्या घरी विडीचे साहित्य पोहच करणे तसेच तयार झालेली विडी घेऊन जाण्याची जबाबदारी देखील विडी काराखाना मालकांची असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
जवळपास तीन महिने झाले सोलापुरातील विडी कामगार महिलांच्या हाताला काम नाही. सर्व दुकाने सुरू होत असताना विडी कारखाने सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, विडी कारखानदारांनी कारखाने सुरू केले नाहीत.
सोलापूर शहरात 70 हजारापेक्षा जास्त विडी कामगार महिला आहेत. या महिलांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा वेळी कारखाने सुरू करण्याची मागणी कामगार नेते आडम मास्तर यांनी केली आहे. त्यानंतर आता महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
सोलापूर शहरातील विविध भागातील विडी उद्योग सुरू करताना कामगारांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त यांनी केल्या आहेत. सोलापूर शहरातील विडी उद्योग चालवणारे कारखानदार यांनी आपल्या कारखान्यातील कायम कर्मचारी यांना हँड ग्लोज, मास्क सॅनिटीझर आदीचा वापर करण्यात यावा. तसेच कारखानादार प्रत्येक विडी कामगारच्या घरी जाऊन त्यांना विडी करण्याचे साहित्य देऊन पुन्हा विडी तयार झाल्यावर ते ने-आण करण्याची जबाबदारी ही पूर्ण विडी कारखानादारवर असेल.
शहरातील विडी कारखानादार हे आपल्या स्वार्थासाठी व आपले नुसकान होईल, यामुळे आज विडी कारखाने सुरू करण्यात आले नाहीत. जर उद्यापासून संबंधित विडी कारखाने सुरू करावेत अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी महिती महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली.