पंढरपूर (सोलापूर) - राज्य सरकारने राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे. त्यावेळी भारतीय जनता पार्टी कोणासोबत आहे आणि सरकारमधील नेते कुठे आहेत ते कळेल, असा टोला भारतीय जनता पार्टीचे माढा खासदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे. भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष देशमुख, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. बी.पी. रोंगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य सरकारने विशेष अधिवेशन घ्यावे -
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन घ्यावे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आंदोलन करण्यापेक्षा राज्यामध्ये विशेष अधिवेशन घ्यावे व त्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा करून नव्याने वटहुकूम काढावा. त्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत नव्याने आयोग नेमावा, त्या आयोगामार्फत मराठा आरक्षणाबाबत ज्या त्रुटी आहेत, त्या भरुन काढाव्यात. त्यानंतर तो विषय सर्वोच्च न्यायालयासमोर ताकतीने मांडावा, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
जनआंदोलन होणार नाही याची दक्षता घ्यावी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा राज्यातील नेत्यांनी आपापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर मराठा आरक्षणासाठी दबाव आणावा. त्यातून लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मार्गी लागावी. आजच्या घडीला मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. त्यातून मराठा समाजाच्या वतीने राज्यांमध्ये कुठेही जनआंदोलन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कारण कोरोना पार्श्वभूमीवर जनआंदोलनामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका आहे, असे प्रतिपादन खासदार निंबाळकर यांनी केले.