सोलापूर - भाजपचे खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी बेडा जंगम या जातीचा दाखला सादर करून सोलापूरची लोकसभा राखीव जागा लढविली होती. बेडा जंगम या जातीचा दाखला जात पडताळणी समितीने रद्द केला आहे.
खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी सादर केलेला जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी दाखल केली होती. यावर आज जात पडताळणी अधिकाऱ्यांनी निकाल दिला आहे. जो दाखला निवडणुकीसाठी सादर करण्यात आला आहे तो दाखला अवैध ठरवण्यात आला आहे.
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांचा महास्वामींनी पराभव केला होता. जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्य महास्वामींनी मिळवले होते.