सोलापूर : पती पत्नीच्या वादाचे परिणाम अतिशय गंभीर असल्याचे आपण पाहिले आहे. अनेकदा या वादांमुळे तिसऱ्या व्यक्तीचा बळी गेल्याचे पाहावयास मिळते. सोलापूरमध्ये देखील नुकतेच जन्मदात्या आईने स्वतःच्या दोन मुलांचा खून केला आहे. सुरुवातीला दोन्ही चिमुकल्याच्या तोंडावर उशी ठेवून खून केला. त्यानंतर आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना विजापूर रस्त्यावरील राजस्व नगरात गुरुवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान घडली आहे.
पती पत्नीचा वाद : पती पत्नीच्या वादाच्या कारणावरून ही घटना घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती कळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ज्योती सुहास चव्हाण (वय २७ वर्ष) असे महिलेचे नाव आहे. तर अथर्व सुहास चव्हाण (वय ३.५ वर्ष) व आर्या सुहास चव्हाण (वय २ वर्ष) अशी दोन चिमुकल्याची नावे आहेत. या घटनेने सोलापूर शहरात शोककळा पसरली आहे.
चिमुकल्यांचा बळी : मयत ज्योती हिचे पती सुहास चव्हाण हे एसटी महामंडळात लिपिक या पदावर काम करतात. सुहास चव्हाण आणि त्यांची पत्नी ज्योती यांच्यात कौटुंबिक कारणातून नेहमी वाद होत होते. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. विजापूर नाका पोलीस अधिक तपास करत आहेत. शाळेला सुट्ट्या असल्याने अथर्व आणि आर्या हे दोघेही घरीच होते. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ते दोन्ही लहान मुले टीव्ही पाहण्यात दंग होते. ज्योतीने टीव्हीचा आवाज आणखी वाढविला. मुलांच्या तोंडावर उशी ठेवून दाब दिला. श्वासोश्वास बंद होऊन मुलांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मुलांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर ज्योती यांनी बेडरूममध्ये गळफास घेऊन जीवन संपवले, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर खरी माहिती समोर येईल.
संशयावरून पती पत्नीत वाद : विजापूर नाका पोलिसांना महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्योती यांच्यासह अथर्व आणि आर्या यांचे मृतदेह पाहून पोलीसही सुन्न झाले. पंचनामा करून तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मयत ज्योती ही पती सुहास यांच्यावर ज्योती संशय घेत होती. या कारणातून त्या पती-पत्नीत नेहमी वाद होत होते. यातूनच ज्योती यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे सुहास यांनी पोलिसांना सांगितले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हनपुडे पाटील यांनी दिली. पोलिसांनी सुहास चव्हाण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.