सोलापूर - शहरातील नई जिंदगी परिसरातील विष्णुनगर येथे एक व्यक्ती अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू विक्री करत असून नई जिंदगी परिसरात गोडावूनमध्ये गावठी दारूचा मोठा साठा केला असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. यावरुन गुन्हे शाखेच्या पोलिसानी शनिवारी कारवाई करत आकाश लक्ष्मण दिंडोरे याला अटक करून जवळपास 2 लाख रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने शनिवारी (दि. 29 ऑगस्ट) त्या सदर ठिकाणी जाऊन छापा मारला असता येथे आकाश लक्ष्मण दिंडोरे (वय 23 वर्षे रा. विष्णुनगर, नई जिंदगी, सोलापूर) यास अटक केले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एकूण 53 ट्यूब हातभट्टी दारु हस्तगत केले. त्या प्रत्येक ट्यूबमध्ये 80 लिटर प्रमाणे 4 हजार 260 लिटर गावठी हातभट्टी दारू ज्याची किंमत अंदाजे 2 लाख 12 हजार रुपये इतके किमतीची गावठी दारू पोलिसांनी जप्त केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्यावर एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त सोलापूर शहर अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पीएसआय संदीप शिंदे, पोलीस हवलदार दिलीप नागटिळक, पोलीस हवालदार अजय पाडवी, पोलीस शिपाई सागर गुंड, पोलीस शिपाई सोमनाथ सुरवसे, पोलीस शिपाई अश्रूभान दुधाळ यांचे पथकाने केली.
हेही वाचा - मटका व्यवसायात 'हा' पोलीस कर्मचारीच होता भागीदार; आयुक्तांनी काढले बडतर्फचे आदेश