सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोहरम सण आणि गणेशोत्सव सार्वजनिक रित्या साजरा करता येणार नाही. याबाबत सोमवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील व उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.भक्तांना रस्त्यांवर मोहरम व गणेशोत्सवाचे मंडप लावता येणार नाहीत.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी मंडप लावून गणेश मूर्ती विक्री करता येणार नाही. गणेश मूर्ती ही ऑनलाईन किंवा जिथे तयार होतात त्या ठिकाणी जाऊन विकत घ्यावी. शासनाच्या नियमानुसार फक्त 4 फूट व 2 फूट गणेश मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळांनी मंडप लावून श्रींची स्थापना करू नये. आरती साठी फक्त 10 भक्तांनी उपस्थित राहून सोशल डिस्टन्सचे नियम पाळून आरती करावी. श्रींच्या आगमन व विसर्जन वेळी कोणासही मिरवणूकीची परवानगी देण्यात येणार नाही. ग्रामीण भागात एक गाव एक गणपतीला प्रोत्साहन दिले जात आहे.
मोहरम उत्सवासाठीदेखील पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नियमावली जाहीर केली आहे. मुस्लिम भक्तांनी डोले, पंजे, ताबूत सार्वजनिक ठिकाणी स्थापन करू नये. ज्या ठिकाणी पक्के बांधकाम आहे त्याच ठिकाणी मोहरमचे पंजे, ताबूत स्थापन करता येणार आहे. पंजे, डोले, ताबूत यांच्या आगमन वेळी व विसर्जन वेळीं कोणीही मिरवणूक काढू नये असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जाहीर केले आहे.