सोलापूर - पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोबाईल बंदीची आज बुधवारपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांना मंदिरात मोबाईल नेण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र, मोबाईल बंदीचा भाविकांना त्रास होऊ नये यासाठी मंदिर समितीकडून लॉकरची सोय उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे.
हेही वाचा... ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: महामार्गावर चालणारे मातीचे टिप्पर तत्काळ बंद
नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक हजारोंच्या संख्येने दाखल झाले. यावेळी मंदिरात मोबाईल बंदी असल्याने भाविकांनी आपला मोबाईल लॉकरमध्ये ठेवण्यासाठी देखील रांग लागली होती. मंदिर समितीने मंदिरात मोबाईल नेण्यास मज्जाव केला. मात्र, मोबाईल लॉकरची देखील सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याने भाविकांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले. समितीने उपलब्ध केलेल्या लॉकरच्या सुविधेसाठी भाविकांना अवघे २ रुपये देणगी शुल्क आकारण्यात आले. तसेच भाविकांना मोबाईल लॉकरमध्ये ठेवण्यासाठी आपले ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे.
हेही वाचा... काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आमदार संग्राम थोपटे यांच्या फोटोला फासले काळे
मंदिर समितीने मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी करण्याबाबत निर्णय घेतला, याचे कारण भाविक फोटो काढताना अधिक वेळ जाया करतात. त्यामुळे पायी दर्शन रांगेत असलेल्या भाविकांना अधिक वेळ तिष्ठत रहावे लागते. हे लक्षात घेऊनच मंदिर समितीने मोबाईल बंदी केली आहे. मागच्या वेळी मोबाईल बंदीचा निर्णय घेतला त्यावेळी मोबाईल लॉकरची व्यवस्था नव्हती. मात्र यावेळी मंदिर समितीने संत ज्ञानेश्वर सभा मंडपाच्या खाली जवळपास अडीच हजार मोबाईल ठेवण्यासाठी लॉकरची व्यवस्था केली असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. तसेच मंदिराची पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन जोशी यांनी केले आहे.