पंढरपूर (सोलापूर) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी (दि. 27) रात्री निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. भारत भालके यांना मूत्रपिंड (किडनी) आणि मधुमेहाचा त्रास होता. गुरुवारी (दि.26 नोव्हेंबर) भारत भालके यांची तब्येत सातत्याने खालावत गेली. कोरोनामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला होता. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. शुक्रवारी दुपारपासून त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर रात्री उशिरा पुण्यातील रूबी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. पंढरपूर तालुक्यातील गोरगरिबांचा व कष्टकरी वर्गांचा पांडुरंग गेल्याची भावना व्यक्त करण्यात आली. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देताना श्रद्धांजली वाहिली आहे.
आमदार भालके यांना 30 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर कोरोनातून बरे होऊन घरी परतले होते. काही दिवसांनी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. कार्यकर्ते आणि चाहत्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी बा विठ्ठलाकडे प्रार्थना केली. सोशल मीडियातून त्यांच्या प्रकृतीसाठी देवाचा धावा करण्यात आला होता. अखेर, भारत नानांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. भारत भालके यांच्या खालावलेल्या प्रकृतीबद्दल माहिती मिळताच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रुग्णालयात धाव घेत आमदार भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आमदार भालके यांच्या निधनाचे वृत्त कळताच सोलापूर जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून रुग्णालयाबाहेरच अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. त्यांच्या पार्थीवावर शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर) सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भारत भालके यांनी आमदारकीची मारली होती 'हॅट्रीक'
भारत भालके यांचा राजकीय प्रवास तालुका स्तरावरील राजकारण ते पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील बारा वर्षे आमदारकी, असा राहिला. भारत भालके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भारत भालके हे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. त्यांनी 1992 साली आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विठ्ठल सहकारी कारख्यानेच संचालक म्हणून सुरू केली होती. 2002 साली विठ्ठल साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. विठ्ठल साखर कारखान्याचे भारत भालके अठरा वर्षे अध्यक्षपदी राहिले. 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाकडून आमदारकी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा त्यवेळी पराभव झाला होता. 2009 साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव करून विधानसभेची पायरी चढले होते मोहितेे पाटलांसाठी हा पराभव जिव्हारी लागणारा होता. 2014 साली मोदी लाट असतानाही भाजप उमेदवार प्रशांत परिचारक यांचा पराभव केला होता. 2019 साली पांडुरंग परिवाराची ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचा यांचा दारुण पराभव आमदारकी 'हॅट्रीक' मारली होती. ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांच्यानंतर भारत भालके यांनी जास्त काळ आमदारकी भूषवली.
वक्तृत्व शैली व रांगड्या भाषेमुळे होते लोकप्रिय
राजकारणाच्या आखाड्यात राजकारणातील पैलवान म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांनी पुढील उमेदवाराला आस्मान दाखवले. एवढेच नाही तर विजयाची हॅट्रीक साधत शरद पवारांचा पठ्ठ्या म्हणून बिरूद मिळवले. भारत भालके आपल्या वक्तृत्व व रांगडी भाषा यामुळे चांगलेच लोकप्रिय होते. यामुळे भारत भालके यांचे नेतृत्व बहरत गेले. वेळोवेळी विधानसभेत मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पाणी प्रश्नांचा केलेला पाठपुरावा, इतर विकासाच्या मुद्द्यावरून मत मिळविण्यात ते यशस्वी ठरले. मराठा आरक्षण आंदोलनावेळी भारत भालकेंनी मराठा समाजाच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला येण्यासही विरोध केला होता. त्यांच्या या भूमिकेचा त्यांना निश्चितच फायदा झाला.
परिचारकांच्या राजकीय वर्चस्वला लगाम लावणारा नेता म्हणून झाली ओळख
पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांनी 25 वर्षे पंढरपूरचे आमदार म्हणून काम केले. मात्र, 2009 झाली विजयसिंह मोहिते-पाटील यांना आमदारकीचे तिकीट दिल्यानंतर सुधाकरपंत परिचारक यांनी माघार घेतली होती. त्यावेळचे अपक्ष आमदार भारत भालके हे मोठ्या मताधिक्क्याने विजय झाले होते. भारत भालके यांनी परिचारक गटविरुद्ध ग्रामपंचायत पासून ते आमदारकीपर्यंत आपला राजकीय संघर्ष केला. 2014 साली प्रशांत परिचारक व 2019 साली सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव केला होता. यारून परिचारकांच्या राजकीय वर्चस्वाला लगाम लावणारा नेता, अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
पंढरपुरातील दिग्गज नेते ठरले कोरोनाचे बळी
मागील आठ महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे पंढरपुरातील राजकीय नेत्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते राजू पाटील, सावरकर साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात आणि भारत भालके यांचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. अशा दिग्गज नेत्यांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - #मुखदर्शन व्हावे आता : पंढरपुरातील स्थानिकांनी घेतले पांडुरंग-रुख्मिणीचे दर्शन