पंढरपूर - यंदाचा आषाढी एकादशी सोहळा 20 जुलैला साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीदेखील आषाढी यात्रा रद्द करून प्रातिनिधिक पद्धतीने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नऊ दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. मात्र, ही संचारबंदी कमी व्हावी, म्हणून स्थानिक आमदारांसह व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे. प्रशासनाकडून संचारबंदीबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. तर जिल्हा प्रशासनाकडून आषाढी एकादशी सोहळ्याबाबत योग्य ते नियोजन केले जात आहे.
पंढरपूर शहरातील संचारबंदीबाबत फेरविचार -
पंढरपूर शहरात पांडुरंगाच्या आषाढी यात्रा काळात गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून 17 ते 25 जुलै दरम्यान पंढरपूर शहर व आसपासच्या 10 गावांवर लागू केली आहे. मात्र, ही संचारबंदी पंढरपूरकरांसाठी जाचक ठरत असल्याचे दिसून येत आहे. आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी ही संचारबंदी तीन दिवसांची असावी, अशी मागणी केली आहे. तर व्यापाऱ्यांनी संचारबंदीचा काळ हा कमी कालावधीचा असावा, अशा मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत या प्रमुख विषयावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना मिळून निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संचारबंदीबाबत दोन दिवसांत फेरविचार केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाकडून संचारबंदीची कडक अंमलबजावणी -
आषाढीदरम्यान कोणत्याही भाविकाला पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही. जिल्हा प्रशासनाकडून नऊ दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात पंढरपूर शहर व आसपासच्या गावांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. त्याआधी पोलीस प्रशासनाकडून 16 जुलैपासून पंढरपूर शहरातील प्रत्येक धर्मशाळा व मठ तपासले जाणार आहेत. त्यामध्ये भाविक किंवा वारकरी आढळल्यास त्याला पंढरपूरच्या बाहेर सोडले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे. तर पंढरपूर शहर व आसपासच्या गावांमध्ये तीन हजाराच्या आसपास पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. त्यात पोलीस प्रशासनाकडून जिल्हा, तालुका व शेवटी पंढरपूर शहराच्या सीमेवर अशी तीन स्तरावर नाकाबंदी केली जाणार आहे.
मानाच्या दहा पालकांना पंढरपुरात प्रवेश -
राज्य सरकारकडून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्यासह दहा मानाच्या पालख्यांना पंढरपुरात प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर त्या पालख्या वाखरी स्थळ येथे आणल्या जाणार आहेत. यामध्ये 40प्रमाणे 400 वारकरी व महाराज मंडळींना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यातही वाखरी ते वीसावा मंदिरपर्यंत पायी दिंडी चालवण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यानंतर अवघ्या 20 महाराज मंडळींना विसावा मंदिर ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पर्यंत पायी दिंडीची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. एकादशीच्या दिवशी मानाच्या दहा पालख्यांना पंढरपुरात चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाचे दर्शन दिले जाणार आहे. त्यानंतर प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणा घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आषाढ महिन्यामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी -
राज्य सरकारकडून आषाढी एकादशी सोहळ्यावर बंदी घातली आहे. तसेच आषाढी यात्रा काळात कोणत्याही भाविकाला पढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यातच आषाढ महिना सुरू आहे. त्यामुळे वारकरी व भाविक संचारबंदी करण्याआधीच पंढरपुरात गर्दी करत आहेत. त्यामुळे येथील बाजारपेठाही फुलल्या आहेत. मात्र, यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून चंद्रभागा नदी पात्रही स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे पंढरपूर नगरपरिषदेकडून पाच ठिकाणी भाविकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये दोन हजार भाविकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.