सोलापूर - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात रोष उफाळून आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या राजकारणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोप मराठा समाज संघटनांकडून केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्व मराठा आंदोलनकांना ताब्यात घेतले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 2020 -2021 या वर्षासाठी नोकरी व शिक्षणसाठी मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मात्र मराठा समाजाच्या वतीने सोलापुरात विविध ठिकाणी गनिमी कावा पद्धतीने आंदोलने करण्यात येत आहेत. आजच्या आंदोलनापूर्वी शुक्रवारी शहरात दोन वेगवेगळी आंदोलने झाली. त्यामध्ये अवंती नगर येथील पाण्याच्या टाकी वरून एका आंदोलकाने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी ताबडतोब त्याच वेळी त्या आंदोलकास ताब्यात घेतले. त्यानंतर सोलापूर-पुणे महामार्गावर टायर पेटवून केंद्र सरकार, राज्य सरकार यांचा निषेध व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनावरही पोलिसांनी कारवाई केली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे, मराठा समाजातील तरुणांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. तसेच शिक्षण क्षेत्रात आणि नोकरी क्षेत्रात आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे मराठा समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे पडसाद राज्य भर उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा पद्धतीने वेगवेगळे मोर्चे काढणार असल्याची माहिती यापूर्वीच दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून, रविवारी शिवाजी चौक येथे तिरडी आंदोलन झाले. अचानक झालेल्या या आंदोलनांमुळे शिवाजी चौकातील पोलिसांची तारांबळ उडाली होती. विशेष शाखेचे पोलीस नाईक अंकुश भोसले हे मराठा समाजाच्या बैठकीला जात असताना त्यांना हे तिरडी आंदोलन दिसले. त्यांनी ताबडतोब आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे किरण पवार, राम जाधव, ओम घाडगे, अर्जुन सोनवणे, विकास लोंढे, राहुल दहीहंडे, श्रीकांत जाधव, ललित धावणे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पोलिसांनी सर्व आंदोलकाना ताब्यात घेतले. या आंदोलन प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.