पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यात अन्नातून विषबाधा ( Mangalwedha Food Poisoning ) झाल्यामुळे सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर विषबाधेमुळे आई-वडीलांवर उपचार सुरू आहेत. भक्ती आबासाहेब चव्हाण ( वय, 6) व नम्रता आबासाहेब चव्हाण ( वय, 4) अशी या मृत्यू झालेल्या दोन चिमुकल्यांची नावे आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ( Mangalwedha Police Station ) पुढील तपास करत आहेत.
आबासाहेब चव्हाण हे पत्नी व दोन मुलींसह मंगळवेढा तालुक्यातील मरवडे ( Mangalwedha Taluka Marwade ) येथे राहतात. त्यांनी मंगळवेढा शहरातील दुकानातून लहान मुलासाठी खाण्यासाठी खाऊ आणला होता. हा खाऊ कुटुंबातील सर्वांनी खाल्ला होता. त्यानंतर अचानकपणे कुटुंबातील प्रत्येकाला अस्वस्थ वाटू लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, मंगळवेढ्यातून पुढील उपचारासाठी आबासाहेब चव्हाण यांच्यासह पत्नी व दोन मुलींना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल केले होते. मात्र, उपचारावेळी पहाटेच्या सुमारास भक्ती व नम्रता यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. पुढील तपास मंगळवेढा पोलीस करत आहे.