माढा (सोलापूर) - विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून एकूण २ लाख २० हजार ६९६ रुपयांचा ऐवज जप्त केल्याची कारवाई माढा पोलिसांनी केली. माढा मार्गावरील केवड गावातील हाॅटेल निसर्ग समोर १५ जूनच्या सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई चंद्रकात गोरे यांच्या तक्रारीवरून चालक आप्पासाहेब मारुती गडगंजे (रा. सौंदरे ता. बार्शी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक अमुल कादबाने यांनी तातडीने पोलीस पथक पाठवून केवड शिवारात नाकाबंदी केली होती. त्यादरम्यान कारमध्ये विदेशी दारूचा माल आढळला. दारूविक्री करून आलेली २५ हजार २२० रुपये रोख, होंडा सिटी कार, दारूचा साठा असा एकूण २ लाख २० हजार ६९६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
आप्पासाहेब गडगंजेने एसपी वाइन शाॅप बार्शी येथून परवाना नसताना विदेशी दारूची वाहतूक केली. गडगंजेची (एमएच १२ सीवाय ६५९६) होंडा सिटी कारसुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे.