माढा (सोलापूर)- कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. लोकांनी स्वत:ची काळजी घ्यावी घरात बसुन लाॅकडाऊनचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिक जर अशा प्रकारे बेजबाबदारपणे वागत राहिले तर कोरोना अनियंत्रित होऊन यापुढील काळात रुग्णालयातुन लोकांचे मुडदे बाहेर पडतील, अशी भीती व्यक्त करत माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी नागरिकांना सल्ला दिला आहे.
यावेळी खासदार निंबाळकर यांनी उजनीच्या पाण्यावरूनही सत्ताधारी आणि बारामतीकरांवर निशाणा साधला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा खासदार निंबाळकर यांनी आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतशी सवांद साधला.
निंबाळकर म्हणाले, सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यभरात तुटवडा आहे. जिल्ह्यातील इंजेक्शन तुटवडा प्रश्नी मी सोलापुर जिल्हाधिकारी यांना बोललो आहे. सध्या कडकडीत लाॅकडाऊनसह नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे.
उजनीच्या पाण्यावरून वाद
पालकमंत्री दत्ता भरणे यांनी उजनी धरणातून इंदापूरला ५ टीएमसी पाणी नेल्याचा जो विषय आहे. त्या विषयाचा संपुर्ण प्रस्ताव मी वाचला आहे. मात्र तो प्रकार म्हणजे स्थिरीकरणाच्या नावावर बारामती लोकसभेचे स्थिरीकरण करण्याचा घातलेला नवीन घाट आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
सोलापुर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदार संघात बारामतीकरांनी अशाच प्रकारे निरा देवधर आणि उजनीच्या माध्यमातून पाणी चोरीचा घाट घातला आहे. सरकार सगळ्यांनी आणायचं आणि फक्त राज्य बारामतीसाठी करायचे, अशा प्रकारचा प्रयोग सध्या महाराष्ट्रात दिसतोय. मात्र लवकर हे सरकार उलथुन पडेल. सत्ता बदलल्यानंतर हे चित्र देखील बदललेले दाखवुन देईन, असेही मत खासदार निंबाळकर यांनी यावेळी बोलुन दाखवत पवार कुटुंबावर निशाणा साधला.
पाणी चोरीच्या प्रकाराला माझा कायम विरोध राहणार असुन या विरोधात जनसंघर्ष लढा उभा करणार, प्रसंगी कोर्टात देखील जाणार असल्याचे
खा.निंबाळकर यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी ज्योती कदम,गटविकास अधिकारी डाॅ.संताजी पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.शिवाजी थोरात,भाजपा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख,डाॅ.बी.पी.रोंगे,गणेश चिवटे,
योगेश पाटील,विजयसिंह परबत,सुधीर गाडेकर आदी उपस्थित होते.
अजित पवार हृदयस्थानी आहेत तर मामांनी पाणी थांबवावे-
उपमुख्यमंत्री अजित पवार हृदयस्थानी असतील तर मग इंदापूरला जाणारे ५ टीमसी पाणी करमाळ्याचे आमदार संजय शिंदेनी थांबवावे, असा चिमटा देखील खासदारांनी आ.शिंदेना घेतला. करमाळ्यात संजय शिंदे यांनी अजित पवार घराणं माझ्या हृदयात. मात्र उजनीचे पाणी पळवु देणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्याला अनुसरुन खासदारांनी टोला लगावला.