पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषदेकडून पंतप्रधान आवास योजनेतील 892 घरांची सोडत ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली. 892 घरांसाठी 914 जणांनी अर्ज केला होता. त्यातील 22 जणांना घरकुल योजनेचा लाभ मिळू शकला नाही. मात्र हे लाभार्थी घराच्या प्रतीक्षा यादीत राहणार आहेत. 892 जणांना हक्काचे घर मिळणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.
ऑनलाइन पद्धतीने 892 घरांची सोडत
पंढरपूर येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 4092 घरांच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील 892 घरांची सोडत पंढरपूर नगर परिषदेकडून करण्यात आली. त्यामध्ये सुमारे 914 लाभार्थ्यांनी लाभ घेतला होता. ही सोडत ऑनलाइन ठेवण्यात आली होती. एकाच वेळी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही सोडत करण्यात आली व नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या हस्ते सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. त्यातील 22 जणांना घराचा लाभ मिळू शकला नाही. मात्र हे लाभार्थी पुढील टप्प्यातील घरांच्या योजनेत असणार आहे.
घरकुल प्रकल्पावर भाजपा व राष्ट्रवादीमध्ये घमासान
आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पंढरपूर येथे गोपाळपूर रोडलगत सुमारे चार हजार घरांचा प्रकल्प मंजूर झाला होता. या प्रकल्पाची जमीन पूररेषेत असल्यामुळे प्रकल्प रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली होती. या तक्रारीनंतर राज्यमंत्री तनपुरे यांनी यास स्थगिती दिली. त्यानंतर परिचारक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. चालू असलेल्या विधिमंडळामध्ये अजित पवार यांनी या प्रकल्पाला सशर्त परवानगी दिली आहे. त्यानंतर नगरपरिषदेकडून ऑनलाइन पद्धतीने घरांची सोडत करण्यात आली.