सोलापूर - शनिवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर व सोलापूर दौऱ्यावर आले होते. पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या व पुरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार 1 लाख 45 हजार 233 हेक्टर शेती जमिनीचे व पिकांचे नुकसान झाले आहे. 14 व्यक्तींचा या महापुरात मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता झाल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली.
14 ऑक्टोबरला सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मर्यादेपेक्षा अधिक पाऊस झाला. शहर व जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. सोलापुरात झालेल्या या अतिवृष्टीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून त4 जण बेपत्ता झाले आहेत. लहान व मोठे असे 829 जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका पंढरपूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, बार्शी या तालुक्याना बसला आहे.
सोलापुरात झालेल्या या निसर्ग संकटाने जिल्ह्यातील 1 लाख 45 हजार 233 हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.ऊस, सोयाबीन, कापूस, भाजीपाला, भुईमूग, बाजरी, ज्वारी, द्राक्षे, मका, उडीद, सूर्यफूल, पपई, केळी, कलिंगड आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात व शहरात 2256 घरांची पडझड झाली आहे. 214 रस्ते( अंतर जिल्हा,व राज्य महामार्ग,राष्ट्रीय महामार्ग) बंद झाले होते, जे हळूहळू सुरू झाले आहेत. या महापुरातून 32 हजार 521 जणांना वाचविण्यात यश आले. या सर्व महापुराचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर दौरा करुन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
कोणत्याही मदतीची घोषणा नाही; उपमुख्यमंत्रीचा कोरडा दौरा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर असताना महापुराची पाहणी केल्यावर कोणती घोषणा करतील आणि किती मदत जाहीर याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतू त्यांनी एकही मदतीची घोषणा केली नाही. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौरा करणार आहेत, त्यावेळी घोषणा केली जाईल असे स्पष्टपणे सांगितले. राज्याचे वित्तमंत्री असताना आणि तिजोरीच्या चाव्या देखील त्यांच्या हाती असताना कोरडा दौरा केला.