सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रांतिक सदस्या आणि करमाळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल या मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी शिवसनेत प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या करमाळा विधानसभा मतदार संघातील उमेदवारीच्या दावेदार असलेल्या, करमाळा तालुक्यातील नेत्या रश्मी बागल या त्यांच्या गटासह शिवसनेमध्ये प्रवेश करीत आहेत. करमाळा मतदार संघात सध्या शिवसेनेचा आमदार असून, रश्मी बागल यांनी मागील निवडणूकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिवसेनेच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. मागील निवडणूकीत रश्मी बागल यांचा एक हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे आता आमदारकीची इच्छा बाळगून रश्मी बागल या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
यामुळे करमाळ्यात शिवसनेची ताकद वाढणार आहे. असे असले, तरी शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील आणि बागल गटाचे करमाळा तालुक्यात राजकीय वैर आहे. त्यामुळे रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विद्यमान आमदार नारायण पाटील यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल.
राष्ट्रवादी पक्षाकडून कामाची कदर केली जात नसल्याचे सांगत, राष्ट्रवादी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे रश्मी बागल यांनी सांगितले आहे. रश्मी बागल यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शिवसनेत प्रवेश करीत असल्याचे स्पष्ट केले.
कोण आहेत रश्मी बागल?
युती सरकारच्या काळात मंत्री असलेल्या करमाळ्याचे माजी आमदार दिंगबर बागल यांच्या रश्मी या कन्या आहेत. दिंगबर बागल यांचे अकाली निधन झाल्यानंतर रश्मी बागल यांच्या आईला राष्ट्रवादी काँग्रेसने करमाळा मतदार संघातून उमेदवारी दिली, आणि त्या निवडून देखील आल्या. नंतर, 2014 च्या विधानसभा निवडणूकीत रश्मी बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने करमाळा मतदार संघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत रश्मी बागल यांचा अवघ्या एक हजार मतांनी पराभव झाला. करमाळ्यातून शिवसनेचे नारायण पाटील हे विजयी झाले. करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा ही बागल कुटुंबीयांनी सांभाळली आहे.
बाजार समिती पासून ते पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर पालिकेमध्ये राजकीय ताकद कायम ठेऊन, बागल गटाने राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार विजयी करत पक्ष वाढीचे काम केले. करमाळा विधानसभा मतदार संघात बागल गटाची ताकद मोठी असून विधानसभा निवडणूकीत बागल गटाला विचारात घेतल्याशिवाय राजकारणच होऊ शकत नाही. रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीचे काम प्रामाणिकपणे केलेले आहे.
मागील लोकसभा निवडणूकीत देखील बागल गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला करमाळा तालुक्यातून मताधिक्य दिले आहे. असे असताना देखील, माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीकडून पराभूत झालेले संजय शिंदे यांनी करमाळ्यातून विधानसभा लढविणार असल्याचे जाहीर केले, आणि त्यानंतर बागल यांनी आता शिवसेनेत जाण्याची भूमिका घेतली आहे.