सोलापूर - करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राजकीय समीकरण बदलले आहे. सभापती पदाच्या खूर्चीसाठी आमदार नारायण पाटील यांची साथ सोडून आलेले प्रा. शिवाजी बंडगर यांनी पून्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीचे सभापतीपद हे आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या गटाकडे आले आहे. यामुळे सत्ताधारी असलेला बागल गटाला विरोधकांची भूमिका बजवावी लागणार आहे.
विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत, तशी राजकीय समिकरणे बदलायला सुरुवात झाली आहे. राज्य पातळीवर पक्षांतराला सुरुवात झाली, तशीच अवस्था तालुका पातळीवर देखील झाली आहे. याचेच उदाहरण करमाळा तालूक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे. अवघ्या 9 महिन्यापूर्वी बागल गटात येऊन बाजार समितीचे सभापतीपद घेणाऱ्या प्रा. शिवाजी बंडगर यांनी राजकीय कोलांटउडी मारली आहे. त्यांनी पून्हा आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या गटात प्रवेश केला आहे.
प्रा. शिवाजी बंडगर यांनी बागल गटात जाऊन सभापती मिळविले होते. आता सभापतीच बागल गटातून फूटून स्वगृही परतले आहेत. त्यामुळे सत्तेत असलेल्या बागल गटाला बाजार समितीमध्ये विरोधकांच्या भूमिकेत रहावे लागणार आहे. करमाळा तालुक्याचे माजी आमदार तथा बाजार समितीचे माजी सभापती जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखालीच बाजार समितीचे कामकाज चालणार असल्याची माहिती करमाळा बाजार समितीचे सभापती बंडगर यांनी दिली. यावेळी प्रा. बंडगर यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या कार्याचा गौरव केला. बाजार समितीची संचालक मंडळाची सभा जेऊर उपबाजार येथे पार पडली. बाजार समितीच्या या बैठकीवर बागल गटातील सदस्यांनी बहिष्कार टाकला. यावेळी पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.