सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणावर नव्याने पकड निर्माण केलेले पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आणि आता भाजपसोबत असलेले संजय शिंदे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. खुद्द शरद पवार हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तर करमाळा विधानससभेतून संजय शिंदे यांचा राजकीय 'वारू' रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार हे स्वतः निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिल्यानंतर लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. भाजप पुरस्कृत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात विजयसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात उघड राजकीय भूमिका घेतली आहे. त्यांनी ती भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्याच्या राजकारणात अडचणीत आणण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही मिळाले.
भाजपच्या तिकिटावर सुरू होती तयारी-
आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असती, तर संजय शिंदे हे भाजपच्या तिकिटावर माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार होते. तशा हालचालीही सुरू झाल्या होत्या. संजय शिंदे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. मात्र, जिल्ह्यातील राजकारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून त्यांनी जिल्हा पातळीवर तिसरी आघाडी स्थापन केली.

माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाले होते. त्यानंतर या मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटलांनी पाऊल टाकले. विजयसिंह मोहिते-पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील घरंदाज आणि मोठे नाव आहे. संपूर्ण देशात मोदी लाट असतानादेखील विजयसिंह मोहिते-पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. माढा लोकसभा हक्काची असून त्यांनी स्वतःची जागा शरद पवारांसाठी सोडली.
विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करण्यासाठी, करमाळा विधानसभा मतदारसंघातून संजय शिंदे यांच्या विरोधात उतरवण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. मोहिते पाटील यांचा पारंपरिक असलेला माळशिरस हा विधानसभेचा मतदार संघ राखीव झालेला आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांना नेमके कोणती जागा ठेवावी, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आहे. त्यामुळे हा पर्याय विचारात घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.
संजय शिंदे राष्ट्रवादीला देत आहेत आव्हान -
पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मिळविली आहे. ही पकड मिळवत असताना त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केला. हे करत असताना संजय शिंदे यांनी भाजपलादेखील सोबत घेतले. तसेच त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप पुरस्कृत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही मिळविले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असतानादेखील जिल्हा परिषदेत भाजप पुरस्कृत अध्यक्ष होऊन जिल्ह्याच्या राजकारणात मीच श्रेष्ठ असल्याचे संजय शिंदे यांनी दाखवून दिले. जिल्हा परिषदेच्या राजकारणात संजय शिंदे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद गेले आहे.

अजित पवार संजय शिदेंची दोस्ती टिकणार का?
जिल्ह्याच्या राजकारणात विधान परिषदेची जागाही संजय शिंदे यांच्यामुळे गेली. या सर्व राजकीय गोष्टींचे उट्टे काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे ज्या करमाळा विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवून आहेत. त्या मतदार संघात विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देऊन संजय शिंदे यांना राजकीय धडा शिकवण्याच्या प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जाण्याची शक्यता आहे. असे असले तरीही सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असलेले तिसरी आघाडी संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करते आणि ही आघाडी अजित पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत असल्याची बाब अनेकवेळा दिसून आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात माढा लोकसभा मतदारसंघातील राजकारण हे गतीने बदलत जाणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष माढाच्या राजकारणाकडे लागले आहे.
खासदारकी सोडल्याने पक्ष मोहिते पाटलांचा नक्कीच विचार करेल - संजय शिंदे
विजयसिंह मोहिते-पाटील हे शरद पवारांचे विश्वास म्हणून ओळखले जातात. खुद्द पवार साहेबांसाठी मोहिते-पाटील हे खासदारकी बाजूला ठेवून पवारांना माढ्यातून लढण्यासाठी आग्रह करत आहेत. त्यामुळे पवार साहेबांकडून देखील त्यांच्यासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कदाचित मोहिते पाटील यांना करमाळा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा विचार चालू आहे. मी स्वतः करमाळा विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे येत्या काळात जनताजनार्दन काय तो निर्णय घेईल हे पाहावे लागेल, असे मत जिल्हा परिषदेची अध्यक्ष संजय शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.
