सोलापूर - आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात रविवारी छत्रपती शिवाजी नाइट कॉलेजमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. त्यावेळी 21 सप्टेंबरला शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच याच दिवशी जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आसूड ओढला जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
मराठा समाजातील गोरगरीब तरुणांसाठी आरक्षण कायम राहायलाच हवे, या मागणीसाठी मागील चार-पाच दिवसांपासून राज्यभर पुन्हा मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चा मधील तरुणांनी दोन दिवसांपूर्वी पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. तर, त्याच दिवशी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग टायर जाळून रोखला होता. रविवारी पुन्हा शिवाजी चौकात राज्य सरकारचा व केंद्र सरकारची प्रतिकात्मक तिरडी आंदोलन झाले. त्यावर सुप्रीम कोर्ट, पंतप्रदान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांची फोटो लावून तिरडी तयार करण्यात आली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा, केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
दुपारी शिवाजी नाइट कॉलेजमध्ये सकल मराठा समाजातील मान्यवरांची आणि मराठा बांधवांची बैठक झाली. या बैठकीत एकमताने निर्णय घेत, 21 सप्टेंबर रोजी शहर आणि जिल्हा बंदची हाक देण्यात आली. सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील 11 आमदारांच्या निवासस्थानासमोर आसूड ओढो आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला होता. गोरगरीब मराठा बांधवाना शिक्षणात आणि नोकरीत संधी मिळाली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीमुळे मराठा समाजाला मिळणारे फायदे स्थगित झाले आहेत. यामुळे राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी 21 तारखेला जिल्हा व शहर बंदची हाक देण्यात आली आहे.