पंढरपूर - जनहित शेतकरी संघटनेकडून पुण्यात साखर आयुक्तांकडे विठ्ठल कारखान्याची गळिताची परवानगी रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, ती मान्य करण्यात आली नाही. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने आठ दिवसात एफआरपीची थकीत रक्कम शेतकरी सभासदांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा कारखान्यात उसाचे एक टिपरूदेखील गाळप होऊ देणार नाही. तसेच आमदार भारत भालके यांना जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आज दिला.
हेही वाचा - टीआरपी घोटाळा : 'अर्णब गोस्वामीचा बोलावता धनी वेगळाच'
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने एफआरपीचे थकीत बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, कामगारांचा पगार द्यावा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ उधळून लावू, असा इशारा देशमुख यांनी दिला होता. कारखाना कार्यस्थळावर घोषणा देत असताना पोलिसांनी काही कार्यकर्त्यांसह देशमुख यांना ताब्यात घेतले. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांची भूमिका मांडली. सीताराम, भीमा, सहकार शिरोमणी कारखान्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला. दोन-दोन वर्षे उसाचे पैसे दिले नाहीत. सहकार मंत्र्यानी राजीनामा दिला पाहिजेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर आमदारकी भोगता, त्या शेतकऱ्यांचे आमदार भारत भालके यांना काही देणे-घेणे वाटत नाही. सगळ्याच कारखानदारांनी यापुढे अन्याय करण्याचा प्रयत्न केला आणि ऊस नियंत्रण कायदा पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला, तर जनहित शेतकरी संघटना सहन करणार नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.
विठ्ठल कारखान्याचे बॉयलर प्रदीपन झाले असले तरी त्या कारखान्याने एफआरपीचे पैसे व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत. कामगारांचा पगार द्यावा, ऊस वाहतुकीचे भाडे द्यावे, अन्यथा आठ-दहा दिवस वाट बघून उसाचे एक टिपरूदेखील या कारखान्यात गळीत होऊ देणार नाही. भारत भालके यांना जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा देशमुख यांनी दिला.