सोलापूर - करमाळा शहरातील किल्ला वेस येथे युवा सेनेच्या वतीने जय भगवान गोयल यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. गोयल यांनी लिहिलेले 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असल्याने त्यांच्या पुतळ्याचे दहन युवा सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद करमाळा येथेही पाहायला मिळाले. गोयल यांनी पुस्तकाचे नाव व फोटोमध्ये नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे असल्याचे भासविले आहे. त्यामुळे, करमाळा युवा सेनेचे युवा अध्यक्ष विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी निषेध म्हणून गोयल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले व 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा दिल्या.
यावेळी सदर निषेध हा शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील जिल्हा परिषद प्रमुख धनंजय डिकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याचे, युवा सेनेचे शहर युवा अधिकारी विशाल गायकवाड यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे दैवत असून त्यांच्यासारखा दुसरा व्यक्ती या भूतलावर झाला नाही आणि होणे शक्य नाही. त्यामुळे, त्यांची तुलना कोणत्याही व्यक्तीशी करू नये. मग ती व्यक्ती पंतप्रधान असो किंवा राष्ट्रपती. याचे समर्थन महाराष्ट्र करणार नाही, असे गायकवाड यांनी सांगितले.
त्याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापन केली. व त्यानुसारच शिवसेना युवासेनेचे कार्य चालू असून त्यांच्याबद्दल असे काही आक्षेपार्ह आढळल्यास शिवसेना युवासेना शांत बसणार नाही. असे असतानाही समाजकंटकांनी जर असे काही कृत्य केले तर त्याचे होणारे परिणाम भोगायची तयारी ठेवावी. त्यांना सडेतोड उत्तर द्यायला शिवसेना युवासेना समर्थ असल्याचे विशाल गायकवाड यांनी सांगितले. यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख मयूर यादव, माजी शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका सागर गायकवाड, उप शहर युवा अधिकारी अविनाश भिसे, दीपक सुरवसे, रणजीत जाधव, योगेश कोळेकर, सुमित जाधव, संकेत कोकाटे, प्रसाद निंबाळकर, जयराज सातपुते, सुहास साळवे, मिटू जाधव, भाऊ शिंदे आदी युवासैनिक उपस्थित होते.
हेही वाचा- 'तुमच्या सगळ्यांचा बाप आला'...सोलापूर शिवसेनेत पुन्हा 'फ्लेक्स वॉर'