सोलापूर - आयपीएल सट्टा बाजारात आणखी एक मोठा मासा क्राईम ब्रँचच्या गळाला लागला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दीपककुमार घनश्याम जोशी याचा तपास करत, त्याकडून 38 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. नोटा मोजण्याची मशीन, फेक नोट डिटेक्टर असा एकूण 38 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे. आयपीएल सट्टा बाजाराचा छडा लावत पोलिसांनी एका महिन्यात 11 आरोपींना अटक करून 1 कोटी 30 लाख,47 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
11 संशयित अटकेत, 1 कोटींचा मुद्देमाल हस्तगत
6 नोव्हेंबर रोजी सोलापूर शहर गुन्हे शाखेने आयपीएल सट्टा बाजारावर धाड टाकून चेतन रामचंद्र वण्याल (वय 26, रा. अक्कलकोट रोड), विघ्नेश नागनाथ गाजुल (वय 24, रा. भद्रावती पेठ, सोलापूर) या दोघांना अटक केली होती. त्यानंतर कलबुर्गी (गुलबर्गा, कर्नाटक) येथपर्यंत हा तपास करण्यात आला. तसेच कलबुर्गी येथूनदेखील रोख रक्कम लॅपटॉप, चारचाकी वाहने, दोन संशयित आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर हा तपास नागपूरच्या दिशेने गेला. तेथूनही तीन संशयित बुकी एजंट्सना ताब्यात घेतले.
आयपीएल क्रिकेट मॅचेस तर संपल्या आहेत, पण देवाण-घेवाण मात्र सुरूच असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून दीपककुमार जोशी (रा. ता. चानसमा, जि. पाटण, गुजरात, सध्या रा. उमा नागरी, सोलापूर) याच्या घरी 30 नोव्हेंबर रोजी छापा टाकला. त्याच्याकडून 38 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम व 22 हजार रुपयांचे इतर साहित्य असा एकूण 38 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ती इनोव्हा कार कुणाची?
गुन्हे शाखेने अतिशय खोलवर जात आयपीएल सट्टा बाजारातील संशयित आरोपींना अटक केले आहे. मात्र एक गौडबंगाल मात्र कायमच आहे. गुलबर्गा येथील सट्टा बाजारावर कारवाई करताना गुन्हे शाखेने अतुल शिरशेट्टी व त्याच्या साथीदाराला अटक केली होती. त्याचबरोबर कलबुर्गी येथून दोन चार चाकी वाहने जप्त केली होती. यामधील एक कार अतुल या संशयित आरोपीची आहे. मात्र त्या कारचा खरा मालक कोण, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.