सोलापूर- मागील तीन ते चार दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे. उजनी धरण हे सध्या वजा 10 टक्क्यांपर्यंत असून लवकरच उजनी धरण हे प्लसमध्ये येणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे उजनी धरणातील पाण्याकडे लागले आहेत.
सोमवारी सकाळी सहा वाजता उजनी धरण हे वजा 10 टक्क्यापर्यंत आले आहे. उजनी धरणात सध्या दौंड येथून 55 हजार 860 क्यूसेक्सने उजनी धरणात पाणी येत आहे तर बंडगार्डन येथून 20 हजार 498 क्यूसेक्सने पाणी येत आहे. त्यामुळे लवकरच उजनी धरणातील पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी रात्री उजनी धरणातील पाणीसाठा हा वजा 17 टक्क्यांपर्यंत होता तो सोमवारी सकाळी सहा वाजता 10 टक्क्यांपर्यंत आला आहे. येत्या दोन दिवसात धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर असाच कायम राहिला तर उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढणार आहे.
मागील वर्षी पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे उजनी धरण हे 100 टक्के भरले होते. मात्र जलसंपदा विभागाच्या आणि राजकीय लोकांच्या पाण्याच्या अयोग्य नियोजनामुळे उजनी धरण हे वजा 45 टक्क्यांपर्यंत गेले होते. उजनी धरणातील पाण्याची पातळी इतकी खाली गेल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाला होता. त्यातच चालू वर्षात पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे शेतकरी हताश होऊन बसलेला होता. अशा परिस्थितीत मागील काही दिवसामध्ये पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम धरणातील पाणीसाठा वाढण्यासाठी होत आहे.