सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सोलापुरात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरू होणार आहे. याचा धसका घेत नागरिकांनी शुक्रवारी सकाळी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले. गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सात दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली. यानंतर शुक्रवारी सकाळी सहा वाजेपासून सोलापूर शहरातील नागरिकांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. ही गर्दी कोरोना वाढीसाठी पोषक ठरेल की काय अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.
डी-मार्टसमोर सकाळी 6 वाजेपासून रांगा
शहरातील डी-मार्टजवळ सकाळी सहा वाजेपासून नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. विशेष म्हणजे महिलावर्ग मोठ्या प्रमाणावर घरातील अत्यावश्यक खरेदीसाठी सकाळी सहा वाजेपासून तयारीत होत्या. सध्याच्या लॉकडाऊनमध्ये सकाळी 7 ते 11 पर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मुभा दिली आहे. या वेळी शहरातील विविध बाजारांत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
सात दिवसांच्या कडक लॉकडाऊनला मुस्लिम धर्मगुरूंचा विरोध
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 8 मे ते 15 मे या काळात शहर आणि जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहे. वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण 14 मे रोजी रमजान ईद आहे. मुस्लिम समाजात या ईदला अनन्यसाधारण महत्व आहे. ऐन सणाअगोदर कडक लॉकडाऊन लागू केल्याने शहर काझी अमजद अली, राफे काजी, एमआयएमचे राजकीय नेते यांनी या कडक लॉकडाऊनला कडाडून विरोध केला आहे. रमजान सणाअगोदर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मुभा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.