सोलापूर - पंढरीसी जावे ऐसें माझे मनी, विठाई जननी भेटे केंव्हा..
न लगे त्याविण सुखाचा सोहळा...
लागे मज ज्वाळा अग्निचिया ...
तुका म्हणे त्याचे पाहिलीया पाय,
मग दुख जाय सर्व माझे....
या विठ्ठल दर्शननाच्या ओढीने निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील सराटी येथील मुक्काम आटोपून आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. त्यानंतर अकलूजच्या सदाशिवराव माने महाविद्यालयाच्या प्रांगणात रिंगण सोहळा रंगला.
अकलूज नगरीत आल्यावर सदाशिवराव माने महाविद्यालयाच्या प्रांगणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मानाचे तिसरे रिंगण पार पडले. रिंगणस्थळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिंडीचे स्वागत केले. त्यानंतर पालखी रथाची एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर सोहळा प्रमुखांनी रिंगण सोहळ्याला सुरुवात केली.
विठ्ठलनामाच्या गजरात सुरुवातीला वैष्णवपंथाच्या पताकाधारी, मग विणेकरी, तुलसी वृंदावनधारी अन मग मृदंग- टाळकरी यांनी गोल रिंगणात धावा केला. त्यानंतर मानाच्या अश्वाची दौड पार पडली. अश्वाने तीन वेगवान फेऱ्या मारत. भाविकांच्या नजरेचे पारणे फेडले. त्यावेळी अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकाच झुंबड उडाली अन बोला पंढरीनाथ महाराज की जय असा विठूनामाचा एकच जयघोष झाला. आज दिवसभर माळशिरस तालुक्यातील नागरिक तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी अकलूजमध्ये हजेरी लावणार आहेत