पंढरपूर (सोलापूर) - देश आणि राज्यावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे आणि सर्वांना विठ्ठलाच्या दर्शनाची संधी मिळावी, असे साकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पांडुरंग आणि रुक्मिणी चरणी घातले. गृहमंत्री देशमुख आषाढी वारीच्या सुरक्षा आढाव्यासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, देशात आणि राज्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे यंदाचा आषाढी पालखी सोहळा आणि पंढरपूरची आषाढी यात्रा रद्द केली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही वारकरी, भाविकांनी सहकार्य केले आहे. गृहमंत्री देशमुख यांनी शनिवारी रात्री मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्गाची पाहाणी केली. यावेळी त्यांनी महाद्वारातूनच विठ्ठलाचे दर्शन घेतले. तसेच कोरोनाचे हे संकट लवकर दूर होऊन पुढच्या आषाढी वारीला सगळ्या वारकऱ्यांसोबत आम्हांलाही देवाच्या दर्शनासाठी येण्याची संधी लाभावी, असे साकडे विठ्ठल-रुक्मिणी चरणी घातले.
हेही वाचा - "भारत-चीन सीमा वादावर राजकारण नकोच"
तसेच ते पुढे म्हणाले, पंढरपूर शहरातील पाच कोटी रूपयांच्या सीसीटीव्हीचा प्रस्ताव लवकरच मंजूर केला जाईल. वारीकाळात पंढरपुरात संचार बंदी लागू करू नये, अशी मागणी होत आहे. यावर लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्ता भरणे, आमदार भारत भालके आदी उपस्थित होते.