सोलापूर - मंगळवेढा तालुक्यातील जंकलगी परिसरातील पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाला असल्याचा अहवाल आला आहे. शनिवारी (दि. 16 जाने.) सायंकाळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढत जंकलगी परिसराच्या एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचा आदेश दिला आहे. तसेच बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी समिती गठीत केली आहे.
त्या कोंबड्याचा मृत्यू अखेर बर्ड फ्ल्यूनेच झाला
जंकलगीमध्ये (मंगळवेढा, जि. सोलापूर) दोन दिवसांपूर्वी कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. जिल्हा प्रशासनाने त्या कोंबड्यांचा मृतदेह ताब्यात घेत तपासणीसाठी पाठवले होते. आज (शनिवार) त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अहवाल येण्यापूर्वीच 1 किमी पर्यंत परिसर सील केला होता.
1 किमी पर्यंतच्या सर्व कोंबड्या नष्ट करणार
जंकलगी संबंधित पोल्ट्री फॉर्म परिसरातील 1 किमीपर्यंत परिसर सील केला आहे. या परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचा आदेश दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी गठीत केली समिती
बर्ड फ्ल्यूचा प्रसार इतर कोंबड्यांमध्ये होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कोंबड्या नष्ट करण्याचा आदेश पारित केला आहे. तसेच एक समिती देखील गठीत केली आहे. यामध्ये प्रांतअधिकारी अध्यक्ष आहेत तर मंगळवेढा येथील तहसीलदार, गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक ,तालुका आरोग्य अधिकारी, बांधकाम विभागाचे उपअभियंता, वन अधिकारी, भूमी अभिलेख तालुका निरीक्षक यांचा यामध्ये समावेश आहे.
हेही वाचा - सोलापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात