सोलापूर - उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कार्यालयात विना हेल्मेट येणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील(आरटीओ) कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. या उपक्रमाला नागरिकही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी 28 फेब्रुवारीला नागरिक आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची पूर्वकल्पना दिली होती. त्यानंतर 2 मार्चपासून हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी स्वत: आरटीओ कार्यालयाच्या गेटवर थांबून कारवाई केली. हेल्मेट न वापरणाऱया मोटारसायकल धारकांना दंड आकारला जात आहे.
हेही वाचा - पुलांचे बांधकाम रखडवणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश
अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने हेल्मेट सक्ती केली आहे. मात्र, नागरिक हेल्मेटचा वापर गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे शहर आणि ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या मदतीने वारंवार कारवाई करुनही अपेक्षित परिणाम होत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत: आपल्या सुरक्षेचा विचार करुन काळजी घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी केले.