बार्शी - सध्याच्या काळात कोरोना रुग्णाजवळ जाण्यास नातेवाईकही धजवत नाहीत. मात्र, आजही अनेक सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तीमुळे मदतीचे काम होत आहे. इतकेच नव्हे तर आता बार्शी येथील गटविकास अधिकाऱ्यांनीच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आहे.
बार्शीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे सरण रचले. त्यांना अग्नीही दिला आहे. ही घटना वैराग येथे घडली. यातून शासकीय जबाबदारीबरोबर सामाजिक भानही राखल्याचे दिसून येत आहे.
रूपा इंद्रजीत राऊत (वय 60) यांना त्यांच्या मुलाने वैराग येथील संतनाथ डेडिकेटेड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यांना अधिक त्रास जाणवू लागला. यानंतर शनिवारी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यानंतर वैराग ग्रामपंचायतीच्या वतीने पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत सरण रचून अंत्यविधी केला. यावेळी खुद्द गटविकास अधिकारी शेखर सावंत आणि ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी मयत व्यक्तीला कोविड सेंटरमधून स्मशानभूमीपर्यंत आणले. तसेच स्वतःच्या हाताने सरण रचूत मुखाग्नी दिला. गटविकास अधिकारी शेखर सावंत आणि ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी अण्णासाहेब जगताप, स्वप्निल चौधरी, बाळासाहेब पांढरमिसे, पांडुरंग चव्हाण, प्रसाद भेंडे, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या सहकार्याने अंत्यविधी करण्यात आला.
हेही वाचा - धारावीत दुसऱ्या लाटेचा धोका रोखण्यात मुंबई महानगरपालिकेला यश
हेही वाचा - कोरोना लसीकरणाच्या अगोदर तरुणांनी रक्तदान करावे; महापौर किशोरी पेडणेकरांचे आवाहन