सोलापूर - शहरातील खाजगी रूग्णालयाकडून अवास्तव बिलाची आकारणी केल्या जात असल्याची तक्रार आल्यानंतर महापालिका आयूक्त पी. शिवशंकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता खाजगी रूग्णालयात कोरोनाच्या रूग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी शासकीय ऑडिटरची नियूक्ती करण्यात आली आहे.
शहरात वाढत्या कोवीड रूग्णांची संख्या लक्षात घेता शहरातील 22 खाजगी रूग्णालयात कोवीड रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रूग्णांवर उपचारानंतर जादा बिल आकारण्यात आल्याच्या अनेक तक्रारी करण्यात येत आहेत. त्यामुळे रूग्णालयाच्या बिलाची तपासणी करण्यासाठी महापालिकेकडून 14 ऑडिटरची नियूक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाकडून कोविड संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून, डी.सी.ए. आणि सी.सी.ए.सी. या रुग्णालयाचे बिल तपासणी करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिले होते.
या आदेशानुसार महानगरपालिकेकडून 14 ऑडिटर आणि 9 आरोग्य मित्र यांची नियूक्ती करण्यात आली आहे. खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाचे बिल 80% व शासनाच्या जी.आर. प्रमाणे 20% दर निश्चित केल्याप्रमाणे बिल आकारले किंवा नाही याची पडताळणी झाल्यानंतर त्यांचे बिल पेमेंन्ट करायचे आहे. हे सर्व काम नेमलेल्या ऑडिटर मार्फत करण्यात येईल. तसेच 9 आरोग्य मित्र महात्मा फुले योजनेअंतर्गत ठरविलेल्या निकषांप्रमाणे रुग्णांची पडताळणी करणार आहेत. तसेच रुग्णांना रुग्णालयात काही गैरसोय होत असेल तर त्याची संपूर्ण माहिती देणे आरोग्य मित्रांची जबाबदारी असेल. असे महानगरपालिकेच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. याबाबतीत तक्रारी असतील तर महानगरपालिकेच्या कंट्रोल रुमला तक्रार करण्याचे आयुक्तांनी केले आहे.
कोविड रुग्णालयात रुग्ण आला त्याला डी.सी.एच. मध्ये भरती करण्यात यावे व प्राथमिक उपचारानतंर सी.सी.सी. केंद्राला पाठविण्य़ाचे निर्देश देण्यात आले आहे. झोपडपट्टी परिसरात जर बाहेर घर असेल तर तिथल्या रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात येत आहे. डी.सी.ए. आणि डी.सी.एस.सी. यांच्याकडे एकूण 940 बेड्स महानगरपालिकेच्या वतीने कोविडसाठी देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त 107 नविन बेड्स कोविडसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तसेच बलवंत इन्स्टिीट्युट न्युरोलॉजी, लाईफ लाईन रुग्णालय व अपेक्स रुग्णालय असे तीन अतिरिक्त रुग्णालये कोविडसाठी अधिग्रहित करण्यात आले आहेत. तसेच धनराज गिरजी रुग्णालय, नर्मदा रुग्णालय व स्पर्श रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी बेड्स वाढविण्यात आले असल्याची माहीतीही आयूक्त पी. शिवशंकर यांनी दिली.