पंढरपूर - उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बोलण टग्याचं आहे आणि वागणं बाई सारखं आहे, अशी खरमरीत टीका गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे. अजित पवारांचे राजकारण चुलत्याच्या जीवावर तर भाजपचं राजकारण बारा बलुतेदार आणि गोरगरीब लोकांच्या पाठींब्यावर आहे. अजित पवार यांचे चालणारे दुकान काही दिवसात बंद पडेल, असा पलटवार भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर केला आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीमध्ये समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आमदार गोपीचंद पडळकर हे मंगळवेढा तालुक्यातील हुलजांती येथे आले होते. त्यावेळेस त्यांनी ही टीका केली. गुरुवारी कल्याणराव काळे यांच्या प्रवेश सभेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली होती.
पार्थ पवार यांना मावळ मधील लोकांनी का नाकारले-
अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामतीत डिपॉझिट जप्त केल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना गोपीचंद पडळकर म्हणाले, तीन जिल्हे पार करून पक्षाचा आदेश होतो. म्हणून मी बारामती विधानसभा निवडणूक लढवली. तो पराभव मान्य आहे. मात्र अजित पवार यांनी मावळ मतदार संघातून अडीच लाख मतदारांनी पार्थ पवार यांना का नाकारला, याचे उत्तर द्यावे, अशी टीका पडळकर यांनी केली.
पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीवर वाईट वेळ-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंढरपूर येथील गल्लीबोळात चहा नाष्टा साठी फिरणे योग्य नसल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. राज्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात कोणताही उपमुख्यमंत्री पोटनिवडणुकीमध्ये अशी गल्ली बोळे फिरलेले दिसले नाही. त्यामुळेच पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीवर वाईट वेळ आल्याची टीका पडळकर यांनी केली.
पवारांचा विठ्ठल कारखाना विकत घेण्याचा डाव-
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांच्या एमआरपी बाबत शब्द काढत नाहीत. करमाळा येथील आदिनाथ साखर कारखाना प्रमाणे विठ्ठल साखर कारखाना डापण्याचा डाव आहे. पवारांची कारखाना विकत घेण्याची चैन आहे. त्यामध्ये विठ्ठल कारखाना 5 ते 10 कोटीला विकत घेण्याचा डाव उपमुख्यमंत्री अजित पवार हे करत आहे, असा आरोप पडळकर यांनी केला.
हेही वाचा- केंद्र राज्याला देणार 1 हजार 121 'व्हेंटिलेटर' - केंद्रीय मंत्री जावडेकर